*बुलढाणा जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळी फीत लावून आंदोलन; प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष**बुलढाणा:*
राज्यभरात सुरू असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी देखील आज काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाच्या दिरंगाईचा निषेध केला.
महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे की, उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दुय्यम (जिल्हा व तालुका) न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी.
या मागणीसाठी उच्च न्यायालयाने एका विशेष न्यायमूर्ती समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर करून जवळपास 20 महिने उलटले आहेत, मात्र अद्याप त्या अहवालावर शासनाने कोणताही ठोस निर्णय (GR) काढलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील सुमारे 34 हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
*आंदोलनाचा टप्पा:*
सध्या हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत आहेत.
संघटनेने इशारा दिला आहे की, जर शासनाने तातडीने मागणी मान्य केली नाही, तर 17 नोव्हेंबरपासून राज्यभरातील सर्व न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या काळी फीत लावूनच काम सुरू ठेवले आहे. मात्र शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

